ग्रामपंचायत ही गावाचा कारभार चालवणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ज्यात सरपंच, उपसरपंच आणि निवडून आलेले सदस्य असतात. गावाच्या विकासासाठी रस्ते, गटारे, पथदिवे, शाळा आणि पाणीपुरवठा यांसारख्या सुविधा पुरवणे हे ग्रामपंचायतीचे मुख्य कार्य आहे. हे एक महत्त्वाचे स्थानिक प्रशासन आहे, जे पंचायती राज व्यवस्थेतील सर्वात खालच्या स्तरावर कार्य करते.
छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.